Welcome to स्वराज्य ॲग्रो   Click to listen highlighted text! Welcome to स्वराज्य ॲग्रो
Uncategorized

आळजापूर येथिल आप्पासाहेब नलवडे यांचा १५ ऑगस्ट

आळजापूर येथिल आप्पासाहेब नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

समाजहिताची अखंड वाटचाल : मा. बाळासाहेब उर्फ आप्पासाहेब नलवडे पाटील
आळजापूर ता फलटण येथील मनमिळावू स्वभाव, हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि समाजहिताची तळमळ या गुणांच्या जोरावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे मा. श्री. बाळासाहेब उर्फ आप्पासाहेब नलवडे पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या सामाजिक वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
मा. बाळासाहेब नलवडे पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळजापूर येथे झाले. त्यानंतरचे माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे झाले. पुढील शिक्षण कॅम्प एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे झाले. विद्यार्थी जीवनापासूनच त्यांच्या मनमिळावू आणि हरहुन्नरी स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला. माणसे जोडण्याची हीच कला पुढील सामाजिक जीवनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोठी ताकद ठरली.
शिक्षणानंतर त्यांनी रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला. या काळात गोरगरीब आणि गरजू नागरिकांशी त्यांचा जवळचा संपर्क आला. त्यांच्या अडचणी समजून घेत मदतीचा हात देत असल्याने समाजातील सर्वसामान्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला.
शेतीसोबतच सामाजिक कार्याची कास धरत त्यांनी गावाच्या विकासात सक्रिय सहभाग घेतला.
त्यांचे चिरजीव नितीन नलवडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सदस्य म्हणून काम करताना गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गावात एकोपा, सामाजिक सलोखा आणि परस्परांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी नेहमीच सर्वांना सोबत घेण्याची भूमिका स्वीकारली.
आळजापूर येथील यात्रा उत्सवाची परंपरा आणि शांततामय आयोजन यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. तब्बल २६ वर्षे यात्रा कमिटीचे अध्यक्षपद भूषवित त्यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन यात्रा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. कोणताही मतभेद न ठेवता सर्वांना विश्वासात घेऊन उत्सवाचे नियोजन करण्याची त्यांची कार्यपद्धती आजही आदर्श मानली जाते.
नलवडे परिवारातील सदस्यांनीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. शशिकांत आण्णासाहेब नलवडे पाटील हे दळणवळण क्षेत्रात ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करीत आहेत. चंद्रकांत आप्पासाहेब पाटील यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत राहून देशसेवा बजावली असून, यशस्वी सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले आहेत. कुटुंबातील सदस्यांनी विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी ही नलवडे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचीच ओळख आहे
पंचायत समिती सदस्य कै . भानुदास नलवडे पाटील यांनीही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली  आप्पासाहेब नलवडे  यांनी सर्वसामान्य गरजू रुग्णांना पुण्यासारख्या शहरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सुमारे २०० रुग्णांना उपचारासाठी मदत व सेवा उपलब्ध करून देत त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले.
मा. बाळासाहेब नलवडे पाटील यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. डॉ. कृष्णचंद्र भोईट, के. हणमंतराव पवार, श्री. प्रसादराव साळुंखे पाटील, भैरवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कासार (आप्पा), श्री. सुभाषराव धुमाळ (नाना) यांच्यासह अनेक मान्यवरांशी त्यांचे स्नेहाचे संबंध राहिले आहेत.
सहकार क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. भैरवनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, फलटण येथे संचालक म्हणून काम करताना त्यांनी सहकार क्षेत्रात योगदान दिले. तसेच आळजापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
शैक्षणिक क्षेत्राशीही त्यांचे नाते अतूट आहे. आळजापूर प्राथमिक शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. तसेच श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी, आदर्की बु., ता. फलटण या संस्थेचे उपाध्यक्षपद भूषविताना शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी योगदान दिले. सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
माणसे जोडणे, सर्वांना सोबत घेणे आणि समाजासाठी सातत्याने कार्यरत राहणे हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख आहे. पदापेक्षा माणुसकीला महत्त्व देत त्यांनी आपल्या कार्यातून समाजात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या सामाजिक वाटचालीला मिळणारे प्रेम आणि आदर हे त्यांच्या कार्याचीच पावती आहे.
अशा या समाजहितैषी, मनमिळावू आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सदैव धावून जाणाऱ्या मा. श्री. बाळासाहेब उर्फ आप्पासाहेब नलवडे पाटील यांना वाढदिवसानिमित्त निरोगी दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि भावी सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
“समाजसेवेची ही अखंड वाटचाल अशीच सुरू राहो आणि आपल्या कार्यातून असंख्य माणसांच्या जीवनात आनंद फुलत राहो, हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!