वाठार स्टेशन – आदर्की दरम्यान रेल्वे इंजीन फेल
मिरज पुणे वर लोहमार्गावर वाठार स्टेशन ते आदर्की दरम्यान एक्सप्रेस गाडीचे रेल्वे इंजिन बंद पडल्याने मिरज पुणे लोहमार्गावरील रेल्वे सेवा तीन तास ठप्प झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त होत होती
आदर्की -वास्को दि गामा–हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसचे इंजिन रविवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास वाठार स्टेशन ते सालपे दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे फेल झाले. रेल्वे किलोमीटर क्रमांक ११५ जवळ इंजिन अचानक बंद पडल्याने गोवा एक्सप्रेस जागेवरच थांबली आणि मिरज–पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल साडेतीन तास पूर्णपणे ठप्प झाली होती
इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती लोको पायलटांनी तात्काळ वाठार स्टेशन रेल्वे स्थानकाला दिली.
त्यानंतर मध्य रेल्वेच्या पुणे येथील नियंत्रण कक्षातून खबरदारीचा उपाय म्हणून मिरज–पुणे मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. परिणामी बंगळुरू–चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस, हॉलिडे एक्सप्रेससह अन्य प्रवासी गाड्या आणि मालगाड्या विविध स्थानकांवर रोखण्यात आल्या.
सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास पर्यायी इंजिन घटनास्थळी पोहोचले. ते गोवा एक्सप्रेसला जोडण्यात आल्यानंतर गाडी पुण्याकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर एक्सप्रेस गाड्या आणि मालगाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सकाळी साडेसहानंतर रेल्वे सेवा हळूहळू सुरळीत झाली.
पुणे–मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले असले, तरी वाठार स्टेशन – सालपे दरम्यान सातारा–फलटण रस्त्यावरील पुलाजवळ गोवा एक्सप्रेस थांबल्याने सिग्नल यंत्रणेच्या मर्यादांमुळे पर्यायी मार्ग काढता आला नाही. त्यामुळे दुहेरी मार्ग असूनही पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अडून राहिल्या.
अंधारा व निर्जन स्थळी तीन तासांहून अधिक काळ ताटकळत बसावे लागल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. भविष्यात अशा तांत्रिक बिघाडांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोणंद जंक्शन येथे कायमस्वरूपी पर्यायी इंजिन उपलब्ध ठेवावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. यामुळे तातडीने पर्यायी इंजिन जोडून रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवता येईल,
चौकट
वाठार स्टेशन जवळ बिट्रीश कालीन आदर्की रेल्वे स्टेशन होते पण दुहीरेकरण करताना आदर्की रेल्वे स्टेशन बंद केले
त्यामुळे वाठार स्टेशन ते सालपे अंतर १९ किलोमीटर आहे त्या मुळे रेल्वे स्टेशन मधील अंतर लांब झालेने रेल्वे लाईन सुरळीत करण्यात उशीर लागतो तरी आदर्की रेल्वे स्टेशन पूर्ववत सुरू करावे